आज मी 13 Best Marathi Stories हा ब्लॉग तुमच्या सर्वांसह सामायिक करीत आहे, जे प्रत्येक मुलासाठी अत्यंत मोलाचे आहे. या नैतिक कथांमुळे मुलांचा समाज समजून घेण्यात खूप मदत होईल, जेणेकरून ते एक चांगला माणूस होऊ शकतील. आपणास ही कथा आवडत असल्यास, इतर लोकांसह सामायिक करा.
1. क्रोध - Marathi Story
एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा.
तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती.
सात्यकी पहारा करू लागला तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले.
पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.
एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार हा वाढलेला त्यांना दिसून आला.
ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती. पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले.
पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला.
रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,’’ तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते.
त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’
तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते.
Also Read - Best Animals Stories In Marathi Language
2. राजा जनक आणि ऋषि अष्टावक्र - Marathi Story
राजा जनक राजा असूनही त्यांना राजवैभवात आसक्ती नव्हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहात. विनम्रता त्यांच्या स्वभावात होती. त्यामुळे ते आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असत. आत्मशोध घेण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न सुरुच असे.
एकदा ते नदीकाठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्याने त्यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले.
मग मोठ्या आवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्या कानात ऋषींच्या बोलण्याचा आवाज गेला पण त्याने आपला जप सुरुच ठेवला. अष्टावक्रही ही गोष्ट जोरजोरात बोलत राहिले.
शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्हणाले,’’माझ्या हातात पाण्याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’
तेव्हा अष्टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंच आवाजात म्हणणे आहे. मंत्राला घोकण्याने काहीच फळ मिळत नाही.
मंत्र आत्मसात करणे किंवा त्याला आतल्या चेतनेशी जोडल्यावरच त्याचे फळ मिळते.’’
तात्पर्य :- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्यापेक्षा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते.
3. विद्या विनयेन शोभते - Marathi Story
राजा ज्ञानसेनच्या दरबारात दररोज शास्त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्त्रासंबंधी चर्चा करण्यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्हणून घोषित केले जात असत त्यांना राजा धन आणि मान देऊन सन्मानित करत असे.
एक दिवस राजा ज्ञानसेनाच्या दरबारात असाच शास्त्रार्थ चालला होता. त्या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्यात आले. राजाने त्याचा भरसभेत सत्कार केला व मान देण्यासाठी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्याच्या विद्वत्तेच्या सन्मानार्थ राजा स्वत: त्याला चव-या ढाळत त्याला घरापर्यंत सोडण्यास आला.
भारवी एवढ्या मोठ्या सन्मानाने घरी आला हे पाहून भारवीच्या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले.
घरी आल्याबरोबर भारवीने मातेला साष्टांग नमस्कार केला पण पित्याला मात्र उपेक्षेने उभ्याउभ्याच नमस्कार केला. त्याच्या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे.
पित्याने त्याच्या त्याही नमस्काराचा स्वीकार केला आणि त्याला चिरंजीवी भव असे म्हटले. गोष्ट इथेच संपली असे नाही. मात्यापित्यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्हते.
याचे कारणही स्पष्ट होते की भारवीला यश पचविता आले नव्हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्या धुंदीत शिष्टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास.
तू शास्त्रार्थ करायला जाणार होतास त्याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्या काळात ते परमेश्वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्यांनी कितीतरी स्वत:च्या इच्छा दाबून ठेवल्या व तुला शास्त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्मत्त होऊन तू त्यांची उपेक्षा केलीस हेच आम्हा दोघांच्या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्याने मातापित्याच्या चरणावर अक्षरश: लोळण घेतली.
अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्यात पुन्हा कधीही त्याने मातापित्यांची सेवा करण्यात कसूर केली नाही.
तात्पर्य :- आयुष्यात आपल्याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्यास मिळाली तरी त्यापाठीमागे आपल्या आईवडीलांची पुण्याई असते हे प्रत्येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते.
4. प्रामाणिक मुलगा - Marathi Story
एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्याच्यावर त्याच्या आईवडीलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरुन तो वागत होता.
एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती.
त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्याने त्यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्याशेजारी सफरचंदे असूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही.
मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला, शेजा-याने त्याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ले नाहीस'' मुलगा म्हणाला,'' इथेच कोणीच नव्हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्हते पण कोणी पाहत नव्हते पण मी स्वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला.
त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला,'' आपण करतो ते आपला आत्मा पाहात असतो, आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्यास जग सुखी होईल.''
तात्पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्यास मुले भविष्यात योग्य वर्तन करतील. वाईट गुण घेण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आईवडीलांना येतो.
5. हि-यापेक्षा जनता महत्वाची - Marathi Story
एक राजा होता. त्याचे सुखी व संपन्न राज्य होते. दुर्दैवाने एकदा त्याच्या राज्यात पाऊसच पडला नाही. त्यामुळे दुष्काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला.
आता पुढे काय हा प्रश्न राजासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता राजाला सतत सतावित होती. त्याने त्याच्या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले,'' ही अंगठी घेऊन शेजारच्या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परिस्थिती सांगा. तो राजा आपली अवस्था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हि-याच्या बदल्यात त्याच्याकडून धान्य मागून आणा व जनतेत वाटप करा.
'' मंत्र्यांनी राजाला विचारले,''राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.'' राजा म्हणाला,''माझे राज्य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्हा प्राप्त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्हा अशी प्रजा मला मिळणार नाही.''
तात्पर्य :- आपल्या हाती जर सत्ता असेल तर त्याचा योग्य विनियोग कसा करता येईल हे पहाणे इष्ट ठरते.
6. लोभाची शिक्षा - Marathi Story
एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला.
तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली.
तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले.
ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले.
दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस
तात्पर्य – लोभाने माणसाच्या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्यक आहे.
7. मनाची एकाग्रता - Marathi Story
एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्याच्या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती.
त्याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता.
अतिशय कमी कालावधीत त्याने वृद्ध योद्धा सोडल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्य' हे बिरूद लावून मिरवू.
त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता.
पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्याच्यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्धाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्याचा उपयोग झाला नाही.
वृद्ध अविचल राहिला त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्याने स्वत:हून हार पत्करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात'' तेव्हा वृद्ध गुरु म्हणाला,'' मुलांनो कोणत्याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्वाची असते. कोणत्याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.''
तात्पर्य : मनाची एकाग्रता साधल्याने बरेचशी कामे साध्य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्यास हमखास यश मिळतेच.
8. महिलेचा निर्भीडपणा - Marathi Story
एकदा खलिफा उमरला जनतेस मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे भाषणही प्रभावी झाले. अधूनमधून लोकांनी खलिफांना प्रश्नही विचारले. त्यांची खलिफानी समाधानकारक उत्तरेही दिली. खलिफाकडून धर्म आणि नीतीबाबत औत्स्युक्य असणा-या लोकांच्याही प्रश्नांची उत्तरे दिली. याच क्रमाने खलिफाने लोकांना प्रश्न केले.
तो म्हणाला,'' जर मी तुम्हाला लोकांना काही आदेश दिला तर तो पाळाल काय'' मोठ्या संख्येने लोकानी सहमती दर्शविली पण एक महिलेने म्हटले,'' नाही, आम्ही तुमचा आदेश पाळणार नाही.'' हे ऐकताच गर्दीतूनही राग व्यक्त झाला. खलिफाने सर्वांना शांत राहण्यास सुचविले.
त्या महिलेला याचे कारण विचारले असताती म्हणाली,''तुम्ही तुमचा पायजमा खूपच लांब घातला आहे. माझ्या पतीचा पायजमा गुडघ्यापर्यंतही येत नाही यावरून असे स्पष्ट होते की तुमच्या शाही भांडारामध्ये तुम्ही तुमच्या हिश्श्यापेक्षा जास्त कपडा घेतला आहे.
'' महिलेला यातून असे सुचवायचे होते की खलिफाचे बोलण्याप्रमाणे वर्तन नाही. यावर खलिफा म्हणाला,''मला याबाबत माहित नाही पण माझा मुलगा याबाबत उत्तर देईल.'' खलिफाचा मुलगा पुढे आला व त्याने सांगितले,''माझ्या वडिलांनी शाही भांडारातून कपडा घेतलेला नाही. माझ्या हिश्श्याचे कापड मी वडिलांना दिले.
सगळ्याप्रमाणेच माझे वडीलही कापड घेत होते त्यात मी वाढ केली'' महिलेचे या उत्तराने समाधान झाले. यावर खलिफा नाराज न होता त्या महिलेला धन्यवाद देऊ लागले कारण खलिफाच्या मते जोपर्यंत जनतेत प्रामाणिक व निर्भीडपणे बोलणारे लोक असणार नाही तोपर्यंत राज्याला किंवा धर्माला धोका नसतो.
9. आत्मनियंत्रणाचे महत्व - Marathi Story
एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला.
परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल.
ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात. बुद्ध म्हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले,''जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते.
पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते.
तात्पर्य :- ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.
10. आचार्य विनोबा भावे - Marathi Story
भूदान चळवळीच्या काळातील ही गोष्ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्यांची पदयात्रा सुरु होती. आपल्या काही शिष्यांसह विनोबाजी मीराजींच्या आश्रमात थांबले होते. अल्पशा विश्रांतीनंतर त्यांची पदयात्रा पुन्हा सुरु झाली.
त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्हती. त्यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्यामुळे त्यांना खुर्चीत बसवून नेण्यात येत होते.
मध्ये मध्ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्हा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्ही काय करत होता असे त्या व्यक्तीने विचारले. विनोबाजी म्हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्ट आली.
जेव्हा आपल्या मनाविरूद्ध एखादी गोष्ट आली जेव्हा आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्यावर वरचढ ठरू पाहतो.
तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''
तात्पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देते.
11. साधू आणि यक्ष - Marathi Story
एक साधू तपश्चर्येस एका निर्जन स्थळी बसले होते. त्या ठिकाणी एका यक्षाचे वास्तव्य होते. या गोष्टीची साधूला कल्पना नव्हती. ते जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा निर्जन स्थान पाहून त्यांनी तेथेच ध्यानधारणा सुरु केली.
त्या वेळी यक्ष तेथे नव्हता. रात्री जेव्हा यक्ष तेथे आला तेव्हा आपल्या जागेवर दुस-यास व्यक्तीला पाहून त्याला राग आला. त्याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्थेत असलेल्या साधूवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्यांना भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ध्यानस्थ असल्याने त्यांच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही.
मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्याचा प्रयत्न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्हा अशा जंगली प्राण्यांची रूपे घेतली तरी साधूच्या ध्यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्याने विषारी सापाचे रूप धारण करून त्यांना दंश केला तरीही त्यांच्यावर याचा काहीच परिणाम दिसेना.
इतक्या प्रयत्नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्याने यक्ष झालेल्या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्या कृपादृष्टीने सापाच्या अंगातील विष अमृत बनले.
यक्ष साधूंना शरण गेला व त्याने त्यांना आदरपूर्वक वंदन केले.
तात्पर्य – एकाग्रता, स्नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो.
12. खरा वेडा कोण - Marathi Story
एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी अनेक मानसशास्त्रीय चाचण्यांना तोंड द्यावे लागत असे.
त्यातील शेवटच्या चाचणीमध्ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्यातील फक्त एकच गोष्ट त्याला उचलण्यास सांगितली जाई. वेड्याने पन्नास रूपये उचचले की त्याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्यास त्याला पुन्हा एकदा चाचण्या पार करायला सांगितल्या जात.
गरज पडल्यास पुन्हा उपचारासाठीही पाठविले जाई.
हॉस्पीटलमधील एक वेडा शेवटच्या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्या पटापट पार करत असे मात्र शेवटच्या चाचणीला मात्र नापास होत असे.
अनेकदा असे घडल्यावर चाचणी घेणारे डॉक्टर कंटाळले व त्यांनी एक युक्ती केली पुढच्या वेळेला त्या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली.
हे पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्या आरामात पार करतोस आणि शेवटच्या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्वत:लाच करावा लागणार आहे.
त्यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्नास रूपयांची नोट उचलून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून का म्हणून घेऊ''
13. धर्म म्हणजे काय ? -
एकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्ठ धर्माचे महत्व समजावून सांगेल त्याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्वीकारेन.
ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठमोठे धर्मगुरु, धर्मोपदेशक, आचार्य राजाला आपल्या धर्माचे महत्व समजावून सांगण्यासाठी येऊ लागले. ते सर्वच जण एकच गोष्ट आठवणीने करत होते की स्वत:च्या धर्माचे महत्व सांगताना मात्र दुस-याला धर्माला कमी लेखत होते.
दुस-याच्या धर्माची निंदानालस्ती करत होते. यातून एकच झाले की, राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे व त्यामुळे तो दु:खी होत होता. पण त्याने शोध सुरुच ठेवला. वर्षानुवर्षे हाच क्रम चालू राहिला.
राजा वृद्ध होत चालला. शेवटी राजा एका साधूच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर त्याने साधूला नमस्कार केला व म्हणाला,''साधूमहाराज, मी सर्वश्रेष्ठ धर्माच्या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्ठ धर्म कोणता हेच कळाले नाही.
'' साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले,''सर्वश्रेष्ठ धर्म तर जगात अस्तित्वातच नाहीत. जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच असतो जिथे व्यक्ती निष्पक्ष असतो, पक्षपात करणा-या मनात धर्म राहूच शकत नाही.
'' साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला.
साधू पुढे जाऊन राजाला म्हणाला,''राजन, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया'' नदीतीरावर दोघे पोहोचले, त्यांनी तिथे अनेक सुंदर नावा (होडया) पाहिल्या. साधू राजाला म्हणाले,'' राजे, चला आपण एका सर्वश्रेष्ठ नावेतून पैलतीर गाठूया'' प्रत्येक नावेपाशी जाताच साधू त्या नावेबद्दल काही ना काही चुक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली.
राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्हटले,''महाराज आपल्याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे, अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्याची इतकी चर्चा कशाला'' साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले,'' राजन, हेच तर मला तुम्हाला सांगायचे आहे.
धर्माला नाव नसतेच, धर्म आपल्याला स्वत:ला पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्याला धर्मापलिकडे पोहोचवू शकत नाही. आपल्यालाच जावे लागते.'' राजा सर्व काही समजून चुकला.
Also Read -
0 Comments